Monday, January 4, 2016

घटस्फोट विवाह रद्द करणे, न्यायिक पृथकता व घटस्फोट

घटस्फोट : बहुकेत जुन्या पाश्चिमात्य समाजात विवाह हा सामाजिक करार समजण्यात येई. शासनाचा त्याच्याशी संबंध नसे. ज्यूंचे धार्मिक सरकार मात्र विवाहासकट सर्व सामाजिक गोष्टींवर नियंत्रण ठेवीत असे. प्राचीन ग्रीक समाजात पती स्त्रीधन परत करून पत्नीला तिच्या बापाकडे पाठवून घटस्फोट घेऊ शकत असे. व्यभिचाराच्या कारणावरून पतीला घटस्फोट घेता येत असे; पण पत्नीला मात्र याच कारणावरून घटस्फोट घेता येत नसे. अथेनियन कायद्याप्रमाणे पति-पत्नी दोघेही घटस्फोट घेऊ शकत असले, तरी पती घटस्फोट घेण्यास अधिक स्वतंत्र होता. दोघांच्या संमतीने घटस्फोट मिळण्याची सोय ही आधुनिकता ध्वनित करणारी त्या काळातील वैशिष्ट्यपूर्ण तरतूद होती. प्राचीन रोमन लोकांतही घटस्फोट मान्य होता. स्त्री-पुरुष दोघांनाही घटस्फोट घेण्यास कायद्याने मुभा होती. विवाह बंधनातून मुक्त केल्याचे साध्या पत्राने पतीने किंवा पत्नीने कळविणे पुरेसे होते. याचा अधिक फायदा श्रीमंत पुरुषांना मिळू लागला. त्यामुळे घटस्फोटाचे प्रमाण वाढू लागले व त्याचा फायदा विशिष्ट वर्गालाच मिळू लागला. परिणामतः ऑगस्टस सीझरने स्वतःच्या कारकीर्दीत (इ. स. पू. ३० ते इ. स. १४) घटस्फोटावर मर्यादा घालणारे कायदे संमत केले, त्यांपैकी ज्यूलियन लॉज हे महत्त्वाचे समजण्यात येतात. रोमच्या इतिहासात विवाह व घटस्फोट हे पहिल्यांदाच शासनाच्या कक्षेत आणण्यात आले. खिस्ती धर्माच्या उदयानंतर स्त्रीच्या स्वातंत्र्यावर आणखीनच मर्यादा पडल्या. त्यामुळे घटस्फोटाच्या स्त्रीच्या हक्कावरही बंधन आले. सोळाव्या शतकात प्रॉटेस्टंट पंथ उदयाला आल्यानंतर नवऱ्याची क्रूरता आदी काही कारणांकरिता स्त्रीस घटस्फोट घेता येऊ लागला. १६८७ साली नॉर्वेत, १७३४ साली स्वीडनमध्ये व प्रशियात आणि १७९२ साली फ्रान्समध्ये व बेल्जियममध्ये घटस्फोटास मान्यता मिळाली. फ्रान्सने १८१६ साली पुन्हा घटस्फोटावर बंदी घातली; परंतु १८८४ साली पुन्हा घटस्फोटाचा कायदा लागू केला. धर्मसुधारणावादी चळवळीनंतर पुष्कळशा प्रॉटेस्टंट देशांनी घटस्फोटास मान्यता दिली. नेदर्लंड्स, डेन्मार्क व स्कॉटलंड या देशांत हा बदल एकाच वेळी घडून आला. हे देश १५६० पासून व्यभिचार वा परित्याग या कारणांकरिता घटस्फोट देत असत. इंग्लंडमध्ये १८५७ च्या मॅट्रिमोनिअल कॉजेस ॲक्टने घटस्फोटास चालना मिळाली.

 घटस्फोट म्हणजे पति-पत्नीचे निर्माण झालेले वैध वैवाहिक संबंध कायदेशीर रीत्या तोडणे. मूलतः विवाह रद्द करणे व घटस्फोट घेणे यात फरक करावयास पाहिजे. मूळ विवाह रद्द करण्यात विवाहच मुळी वैध झालेला नसतो. असा विवाह रद्द करण्याकरिता पक्षकाराने न्यायालयाकडेच दाद मागावयास पाहिजे, असे नाही. त्याचप्रमाणे न्यायिक पृथक्‌ता व घटस्फोट यांमधील फरक घटस्फोटाची कायदेशीर व्याप्ती समजून घेण्याच्या दृष्टीने आवश्यक आहे. न्यायिक पृथक्‌ता हे घटस्फोटाकरिता एक कारण होऊ शकते. न्यायिक पृथक्‌तेच्या हुकूमनाम्याने वैवाहिक वैध संबंध फक्त निलंबित होतात; कायमचे संपुष्टात येत नाहीत. न्यायालयाचा हुकूमनामा घेऊन ते पूर्ववत करता येतात किंवा कायमचे तोडता येतात. घटस्फोटाचा हुकूमनामा वैवाहिक संबंध कायमचे संपुष्टात आणणारा असतो. घटस्फोटाने जसे वैवाहिक संबंध पूर्णपणे व कायमचे तोडता येतात, तसे न्यायिक पृथक्‌तेने होत नाही. मूलतः विवाह रद्द करणे, न्यायिक पृथकता व घटस्फोट या तिन्हींची कायद्यात नमूद केलेली कारणेही भिन्न भिन्न आहेत.



हिंदू धर्मशास्त्रात विवाह हा एक महत्त्वाचा धार्मिक संस्कार मानण्यात आला आहे. या संस्काराने निर्माण झालेले बंधन अखंड असते, जन्मोजन्मी ते टिकते, अशी सर्वसाधारण समजूत आहे. धर्मग्रंथही सामान्यतः असेच प्रतिपादन करतात; पण पुरुषांनी विवाहाची बंधने अनेक वेळा झुगारून दिलेली आहेत. स्त्रीने पतीचा त्याग करणे किंवा पुनर्विवाह करणे हे मात्र महापाप समजण्यात येई. इसवी सनाच्या चौथ्या-पाचव्या शतकात व नंतरच्या काळातही घटस्फोटाला विरोधच दिसून येतो. त्या काळातील धर्मग्रंथांतही त्याचे प्रतिबिंब दिसते. इसवी सनापूर्वी एक दोन शतके किंवा त्या सुमारास काही विशिष्ट प्रसंगी विवाहविच्छेद मान्य असावा, असे दिसते. प्राचीन वेदादी ग्रंथांत घटस्फोटाचा उल्लेख सापडत नाही; पण बौद्ध वाङ्‌मयात मात्र थोड्याबहुत प्रमाणात तो आढळतो. मनू, पाराशर इत्यादींची काही वचने विशिष्ट परिस्थितीत विवाहविच्छेदन योग्य असल्याचे दर्शवितात. पति-पत्नीचे काही कारणाने एकत्र राहणे कठीण झाले, तर घटस्फोट घ्यावा असे कौटिल्य सांगतो; पण ही मुभा विशिष्ट विवाहप्रकारापुरतीच (आसुर, गांधर्व, पैशाच) मर्यादित आहे. खालच्या जातीत जरी हे विवाहप्रकार असले, तरी ब्राह्मण किंवा इतर वरिष्ठ जाती त्यांपासून अलिप्त होत्याच असे नाही. यावरून कमीअधिक प्रमाणात सर्व थरांत विशिष्ट परिस्थितीत घटस्फोट रूढ होता, असे अनुमान काढण्यास वाव आहे; पण त्याचा फायदा बव्हंशी पुरुषांना मिळत असे.

शिकारी व पशूंचे कळप घेऊन हिंडणाऱ्या समाजात घटस्फोटाचे प्रमाण वाढते होते; पण जसजसा समाज शेतीप्रधान होत गेला व कुटुंबावर पित्याची सत्ता जसजशी प्रस्थापित होऊन पितृसत्ताक कुटुंबाची कल्पना रूढ होत गेली, तसतसे घटस्फोटाचे प्रमाण कमी होत गेलेले दिसते. विशेषतः जमीन अखंड ठेवण्याच्या गरजेमुळे आणि स्त्रीला शेतकामात महत्त्व प्राप्त होत गेल्यामुळे स्त्रियांना घटस्फोट मिळणे कठीण होऊ लागले. हिंदू, ग्रीक, रोमन, ज्यू, चिनी यांसारख्या सर्व प्राचीन समाजांत ही गोष्ट दिसून येते. या संस्कृतींचा आर्थिक पाया शेतीचा होता व कुटुंबरचना पितृप्रधान होती. साहजिक या दोहोंचे प्रतिबिंब या समाजांतील घटस्फोटांच्या नियमांत पडलेले दिसून येते. पुरुषाचा घटस्फोटाचा हक्क अबाधित होता. त्याच्या स्त्रीवरील अनियंत्रित अधिकाराचे ते प्रतीकच होते. असे असले, तरी पुरुषांचे नपुंसकत्व, व्यंग, दुर्धर रोग, पत्नीचा दीर्घ काळ त्याग, दीर्घ काळ घरातील अनुपस्थिती किंवा उपेक्षा अशा अपवादात्मक परिस्थितीत स्त्रियांना घटस्फोटाची मुभा बहुतेक सर्व प्राचीन समाजांत होती. प्राचीन संस्कृतीत वर्गीय भेद महत्त्वाचे असल्यामुळे घटस्फोटाचे वरील चित्र मुख्यतः धनिक आणि वरच्या वर्गाचे आहे. खालच्या वर्गात घटस्फोटाबाबतची बंधने सापेक्षतः सैल होती.

निष्ठ जमातीत त्याचप्रमाणे विभिन्न प्रांतांत रूढीच्या नावाखाली घटस्फोट घेतला जाऊ शके. आजही ही प्रथा बंद झालेली नाही. पाश्चिमात्यांत व्यक्तिस्वातंत्र्याच्या कल्पनेमुळे घटस्फोटासंबंधीचे कायदे भारतापेक्षा लवकर अस्तित्वात आले. भारतात यासंबंधीचा पहिला कायदा पारशी मॅरेज अँड डायव्होर्स ॲक्ट १८६५ साली अस्तित्वात आला. त्याच्या नंतर ख्रिश्चनांकरिता इंडियन डायव्होर्स ॲक्ट १८६९ अस्तित्वात आला. द डिस्सोल्यूशन ऑफ मुस्लिम मॅरेज ॲक्ट १९३९ साली संमत झाला. १९४७ साली त्या वेळच्या मुंबई प्रांतात सरकारने घटस्फोटाचा कायदा संमत केला. असे असले, तरी सर्व प्रांतांना व सर्व थरांतील हिंदू लोकांना व जमातींना लागू होणारा एक कायदा १९५४ पर्यंत अस्तित्वात नव्हता. १९५४ साली अशा प्रकारचा स्पेशल मॅरेज ॲक्ट अस्तित्वात आला व तो देशभर लागू करण्यात आला. त्यानुसार धर्म, जाती, पंथ इ. बाबींचा विवाहाच्या बाबतीत अडसर राहिला नाही. या अधिनियमाच्या अंतर्गत विवाह करणाऱ्यांकरिता जरूर पडल्यास घटस्फोटासंबंधी कायद्यातील तरतुदी हिंदू विवाह अधिनियमाच्या (१९५५) तेराव्या कलमात सांगितल्या आहेत. पतिपत्नीला या कलमात सांगितलेल्या कोणत्याही कारणाकरिता परस्परांपासून घटस्फोट मागता येतो. व्यभिचारी असणे, धर्मांतर करून हिंदु धर्म सोडणे, अर्जाच्या लगत पूर्वी कमीत कमी तीन वर्षेपर्यंत दुरुस्त न होणारे वेड असणे किंवा गुप्तरोग व बरा न होणारा महारोग असणे किंवा संसर्गजन्य गुप्तरोग असणे, संन्यास घेणे, कमीतकमी सात वर्षापर्यंत बेपत्ता असणे, न्यायिक पृथक्‌पणानंतर दोन वर्षे किंवा अधिक दांपत्यभावाने सहवास न करणे, दांपत्य अधिकारांच्या प्रत्यास्थापनाचा हुकूमनामा झाल्यानंतर दोन किंवा अधिक वर्षे तशी प्रत्यास्थापना न करणे यांपैकी कोणतेही कारण घटस्फोट मिळविण्यास पुरेसे आहे. याव्यतिरिक्त स्त्री आणखी दोन कारणांकरिता घटस्फोट घेऊ शकते : (१) हा अधिनियम अंमलात येण्यापूर्वी किंवा नंतर पतीने दुसरे लग्न केलेले असणे व ती पत्नी जिवंत असणे. (२) पती जबरी संभोग, अनैसर्गिक संबंध किंवा पशुसंबंध यांबद्दल दोषी असणे.

No comments:

Post a Comment