Monday, January 4, 2016

घटस्फोट विवाह रद्द करणे, न्यायिक पृथकता व घटस्फोट

घटस्फोट : बहुकेत जुन्या पाश्चिमात्य समाजात विवाह हा सामाजिक करार समजण्यात येई. शासनाचा त्याच्याशी संबंध नसे. ज्यूंचे धार्मिक सरकार मात्र विवाहासकट सर्व सामाजिक गोष्टींवर नियंत्रण ठेवीत असे. प्राचीन ग्रीक समाजात पती स्त्रीधन परत करून पत्नीला तिच्या बापाकडे पाठवून घटस्फोट घेऊ शकत असे. व्यभिचाराच्या कारणावरून पतीला घटस्फोट घेता येत असे; पण पत्नीला मात्र याच कारणावरून घटस्फोट घेता येत नसे. अथेनियन कायद्याप्रमाणे पति-पत्नी दोघेही घटस्फोट घेऊ शकत असले, तरी पती घटस्फोट घेण्यास अधिक स्वतंत्र होता. दोघांच्या संमतीने घटस्फोट मिळण्याची सोय ही आधुनिकता ध्वनित करणारी त्या काळातील वैशिष्ट्यपूर्ण तरतूद होती. प्राचीन रोमन लोकांतही घटस्फोट मान्य होता. स्त्री-पुरुष दोघांनाही घटस्फोट घेण्यास कायद्याने मुभा होती. विवाह बंधनातून मुक्त केल्याचे साध्या पत्राने पतीने किंवा पत्नीने कळविणे पुरेसे होते. याचा अधिक फायदा श्रीमंत पुरुषांना मिळू लागला. त्यामुळे घटस्फोटाचे प्रमाण वाढू लागले व त्याचा फायदा विशिष्ट वर्गालाच मिळू लागला. परिणामतः ऑगस्टस सीझरने स्वतःच्या कारकीर्दीत (इ. स. पू. ३० ते इ. स. १४) घटस्फोटावर मर्यादा घालणारे कायदे संमत केले, त्यांपैकी ज्यूलियन लॉज हे महत्त्वाचे समजण्यात येतात. रोमच्या इतिहासात विवाह व घटस्फोट हे पहिल्यांदाच शासनाच्या कक्षेत आणण्यात आले. खिस्ती धर्माच्या उदयानंतर स्त्रीच्या स्वातंत्र्यावर आणखीनच मर्यादा पडल्या. त्यामुळे घटस्फोटाच्या स्त्रीच्या हक्कावरही बंधन आले. सोळाव्या शतकात प्रॉटेस्टंट पंथ उदयाला आल्यानंतर नवऱ्याची क्रूरता आदी काही कारणांकरिता स्त्रीस घटस्फोट घेता येऊ लागला. १६८७ साली नॉर्वेत, १७३४ साली स्वीडनमध्ये व प्रशियात आणि १७९२ साली फ्रान्समध्ये व बेल्जियममध्ये घटस्फोटास मान्यता मिळाली. फ्रान्सने १८१६ साली पुन्हा घटस्फोटावर बंदी घातली; परंतु १८८४ साली पुन्हा घटस्फोटाचा कायदा लागू केला. धर्मसुधारणावादी चळवळीनंतर पुष्कळशा प्रॉटेस्टंट देशांनी घटस्फोटास मान्यता दिली. नेदर्लंड्स, डेन्मार्क व स्कॉटलंड या देशांत हा बदल एकाच वेळी घडून आला. हे देश १५६० पासून व्यभिचार वा परित्याग या कारणांकरिता घटस्फोट देत असत. इंग्लंडमध्ये १८५७ च्या मॅट्रिमोनिअल कॉजेस ॲक्टने घटस्फोटास चालना मिळाली.

 घटस्फोट म्हणजे पति-पत्नीचे निर्माण झालेले वैध वैवाहिक संबंध कायदेशीर रीत्या तोडणे. मूलतः विवाह रद्द करणे व घटस्फोट घेणे यात फरक करावयास पाहिजे. मूळ विवाह रद्द करण्यात विवाहच मुळी वैध झालेला नसतो. असा विवाह रद्द करण्याकरिता पक्षकाराने न्यायालयाकडेच दाद मागावयास पाहिजे, असे नाही. त्याचप्रमाणे न्यायिक पृथक्‌ता व घटस्फोट यांमधील फरक घटस्फोटाची कायदेशीर व्याप्ती समजून घेण्याच्या दृष्टीने आवश्यक आहे. न्यायिक पृथक्‌ता हे घटस्फोटाकरिता एक कारण होऊ शकते. न्यायिक पृथक्‌तेच्या हुकूमनाम्याने वैवाहिक वैध संबंध फक्त निलंबित होतात; कायमचे संपुष्टात येत नाहीत. न्यायालयाचा हुकूमनामा घेऊन ते पूर्ववत करता येतात किंवा कायमचे तोडता येतात. घटस्फोटाचा हुकूमनामा वैवाहिक संबंध कायमचे संपुष्टात आणणारा असतो. घटस्फोटाने जसे वैवाहिक संबंध पूर्णपणे व कायमचे तोडता येतात, तसे न्यायिक पृथक्‌तेने होत नाही. मूलतः विवाह रद्द करणे, न्यायिक पृथकता व घटस्फोट या तिन्हींची कायद्यात नमूद केलेली कारणेही भिन्न भिन्न आहेत.



हिंदू धर्मशास्त्रात विवाह हा एक महत्त्वाचा धार्मिक संस्कार मानण्यात आला आहे. या संस्काराने निर्माण झालेले बंधन अखंड असते, जन्मोजन्मी ते टिकते, अशी सर्वसाधारण समजूत आहे. धर्मग्रंथही सामान्यतः असेच प्रतिपादन करतात; पण पुरुषांनी विवाहाची बंधने अनेक वेळा झुगारून दिलेली आहेत. स्त्रीने पतीचा त्याग करणे किंवा पुनर्विवाह करणे हे मात्र महापाप समजण्यात येई. इसवी सनाच्या चौथ्या-पाचव्या शतकात व नंतरच्या काळातही घटस्फोटाला विरोधच दिसून येतो. त्या काळातील धर्मग्रंथांतही त्याचे प्रतिबिंब दिसते. इसवी सनापूर्वी एक दोन शतके किंवा त्या सुमारास काही विशिष्ट प्रसंगी विवाहविच्छेद मान्य असावा, असे दिसते. प्राचीन वेदादी ग्रंथांत घटस्फोटाचा उल्लेख सापडत नाही; पण बौद्ध वाङ्‌मयात मात्र थोड्याबहुत प्रमाणात तो आढळतो. मनू, पाराशर इत्यादींची काही वचने विशिष्ट परिस्थितीत विवाहविच्छेदन योग्य असल्याचे दर्शवितात. पति-पत्नीचे काही कारणाने एकत्र राहणे कठीण झाले, तर घटस्फोट घ्यावा असे कौटिल्य सांगतो; पण ही मुभा विशिष्ट विवाहप्रकारापुरतीच (आसुर, गांधर्व, पैशाच) मर्यादित आहे. खालच्या जातीत जरी हे विवाहप्रकार असले, तरी ब्राह्मण किंवा इतर वरिष्ठ जाती त्यांपासून अलिप्त होत्याच असे नाही. यावरून कमीअधिक प्रमाणात सर्व थरांत विशिष्ट परिस्थितीत घटस्फोट रूढ होता, असे अनुमान काढण्यास वाव आहे; पण त्याचा फायदा बव्हंशी पुरुषांना मिळत असे.

शिकारी व पशूंचे कळप घेऊन हिंडणाऱ्या समाजात घटस्फोटाचे प्रमाण वाढते होते; पण जसजसा समाज शेतीप्रधान होत गेला व कुटुंबावर पित्याची सत्ता जसजशी प्रस्थापित होऊन पितृसत्ताक कुटुंबाची कल्पना रूढ होत गेली, तसतसे घटस्फोटाचे प्रमाण कमी होत गेलेले दिसते. विशेषतः जमीन अखंड ठेवण्याच्या गरजेमुळे आणि स्त्रीला शेतकामात महत्त्व प्राप्त होत गेल्यामुळे स्त्रियांना घटस्फोट मिळणे कठीण होऊ लागले. हिंदू, ग्रीक, रोमन, ज्यू, चिनी यांसारख्या सर्व प्राचीन समाजांत ही गोष्ट दिसून येते. या संस्कृतींचा आर्थिक पाया शेतीचा होता व कुटुंबरचना पितृप्रधान होती. साहजिक या दोहोंचे प्रतिबिंब या समाजांतील घटस्फोटांच्या नियमांत पडलेले दिसून येते. पुरुषाचा घटस्फोटाचा हक्क अबाधित होता. त्याच्या स्त्रीवरील अनियंत्रित अधिकाराचे ते प्रतीकच होते. असे असले, तरी पुरुषांचे नपुंसकत्व, व्यंग, दुर्धर रोग, पत्नीचा दीर्घ काळ त्याग, दीर्घ काळ घरातील अनुपस्थिती किंवा उपेक्षा अशा अपवादात्मक परिस्थितीत स्त्रियांना घटस्फोटाची मुभा बहुतेक सर्व प्राचीन समाजांत होती. प्राचीन संस्कृतीत वर्गीय भेद महत्त्वाचे असल्यामुळे घटस्फोटाचे वरील चित्र मुख्यतः धनिक आणि वरच्या वर्गाचे आहे. खालच्या वर्गात घटस्फोटाबाबतची बंधने सापेक्षतः सैल होती.

निष्ठ जमातीत त्याचप्रमाणे विभिन्न प्रांतांत रूढीच्या नावाखाली घटस्फोट घेतला जाऊ शके. आजही ही प्रथा बंद झालेली नाही. पाश्चिमात्यांत व्यक्तिस्वातंत्र्याच्या कल्पनेमुळे घटस्फोटासंबंधीचे कायदे भारतापेक्षा लवकर अस्तित्वात आले. भारतात यासंबंधीचा पहिला कायदा पारशी मॅरेज अँड डायव्होर्स ॲक्ट १८६५ साली अस्तित्वात आला. त्याच्या नंतर ख्रिश्चनांकरिता इंडियन डायव्होर्स ॲक्ट १८६९ अस्तित्वात आला. द डिस्सोल्यूशन ऑफ मुस्लिम मॅरेज ॲक्ट १९३९ साली संमत झाला. १९४७ साली त्या वेळच्या मुंबई प्रांतात सरकारने घटस्फोटाचा कायदा संमत केला. असे असले, तरी सर्व प्रांतांना व सर्व थरांतील हिंदू लोकांना व जमातींना लागू होणारा एक कायदा १९५४ पर्यंत अस्तित्वात नव्हता. १९५४ साली अशा प्रकारचा स्पेशल मॅरेज ॲक्ट अस्तित्वात आला व तो देशभर लागू करण्यात आला. त्यानुसार धर्म, जाती, पंथ इ. बाबींचा विवाहाच्या बाबतीत अडसर राहिला नाही. या अधिनियमाच्या अंतर्गत विवाह करणाऱ्यांकरिता जरूर पडल्यास घटस्फोटासंबंधी कायद्यातील तरतुदी हिंदू विवाह अधिनियमाच्या (१९५५) तेराव्या कलमात सांगितल्या आहेत. पतिपत्नीला या कलमात सांगितलेल्या कोणत्याही कारणाकरिता परस्परांपासून घटस्फोट मागता येतो. व्यभिचारी असणे, धर्मांतर करून हिंदु धर्म सोडणे, अर्जाच्या लगत पूर्वी कमीत कमी तीन वर्षेपर्यंत दुरुस्त न होणारे वेड असणे किंवा गुप्तरोग व बरा न होणारा महारोग असणे किंवा संसर्गजन्य गुप्तरोग असणे, संन्यास घेणे, कमीतकमी सात वर्षापर्यंत बेपत्ता असणे, न्यायिक पृथक्‌पणानंतर दोन वर्षे किंवा अधिक दांपत्यभावाने सहवास न करणे, दांपत्य अधिकारांच्या प्रत्यास्थापनाचा हुकूमनामा झाल्यानंतर दोन किंवा अधिक वर्षे तशी प्रत्यास्थापना न करणे यांपैकी कोणतेही कारण घटस्फोट मिळविण्यास पुरेसे आहे. याव्यतिरिक्त स्त्री आणखी दोन कारणांकरिता घटस्फोट घेऊ शकते : (१) हा अधिनियम अंमलात येण्यापूर्वी किंवा नंतर पतीने दुसरे लग्न केलेले असणे व ती पत्नी जिवंत असणे. (२) पती जबरी संभोग, अनैसर्गिक संबंध किंवा पशुसंबंध यांबद्दल दोषी असणे.

सायण व काही पश्चिमी पंडीत पाऊस अडविणारा दानव म्हणजे वृत्र होय

इंद्र : वैदिक देवताविद्येत इंद्राला मुख्य स्थान आहे. वैदिक भारतीयांचा इंद्र हा सर्वश्रेष्ठ व प्रमुख असा राष्ट्रीय देव आहे. जवळजवळ एक चतुर्थांश ऋग्वेद इंद्राला वाहिलेला आहे. इंद्र हा युद्धदेव आहे. ऋग्वेदकाळी भारतीय निरंतर संग्रामस्थ होते. इंद्र अश्वरथात बसून त्यांना युद्धात विजयी करी. तो स्वतः विश्वातील राक्षसी शक्तींशी नरंतर युद्ध करून त्या शक्तींचा निःपात करतो. त्याच्या अतुलनीय सामर्थ्याची, युद्धातील यशस्वी कर्तृत्वाची वर्णने ऋग्वेदातील ऋषी वारंवार करतात. तो आपल्या भयंकर वज्राने व धनुष्यबाणांनी लढाई करून दस्यूदानवांचा विध्वंस करतो. विशेषतः त्याचा मुख्य शत्रू वृत्र होय. वृत्रनाशाच्या पराक्रमावर रचलेली पुष्कळ सूक्ते ऋग्वेदात. वृत्र हा दानव जलप्रवाह अडवतो आणि अनावृष्टी व दुर्भिक्ष्य निर्माण करतो.

इंद्राचे बाहू बलशाली आणि अत्यंत लांबलचक आहेत. अनंत विस्तार असलेला द्यूलोक आणि प्रचंड पृथ्वी ही त्याच्या एका मुठीत मावतात
वज्रधारी इंद्र : दक्षिण भारतातील एका लाकडी मूर्तीवरून केलेले रेखाटन.वज्रधारी इंद्र : दक्षिण भारतातील एका लाकडी मूर्तीवरून केलेले रेखाटन.
 (ऋग्वेद १.८०.८; ४.२१.९; ६.१९.३). त्याचे केस व दाढी सोनेरी आहे आणि शरीराचा रंगही सोनेरी-गोरा आहे. त्याचे शरीर द्यूलोक आणि पृथ्वी ही पासंगालाही पुरणार नाहीत, एवढे मोठे आहे. सोमपानाच्या योगाने आणि स्तोत्रमंत्रांनी त्याचे सामर्थ्य- अत्यंत भरतीस येते. चार किंवा तीस तळी भरतील इतका सोमरस पिऊन तो पचवितो. इंद्राने कधी एका बैलाचे, कधी वीस बैलांचे तर कधी शंभर रेड्यांचे मांस पचविले आहे (ऋग्वेद १०.२७, २८, ८६; ६.१७). त्याची 'पुरभिद्', 'वृत्रहन्' आणि 'मघवन्' अशी विशेषणे वारंवार येतात. मरुद्‌गण हे त्याचे युद्धातले सहकारी होत. दानवशत्रूंची वसती असलेली दगडांची धातूंची नव्वद किंवा नव्व्याण्णव किंवा शंभर पुरे त्याने फोडून टाकली, म्हणून त्यास 'पुरभिद्' म्हणतात. सर्प असलेला वृत्र हा त्याचा शत्रू. हा शत्रू पर्वतात वसती करून नद्यांचे प्रवाह स्वतःच्या अंगाने अडवतो. इंद्र वृत्राला अशा स्थितीत वज्राने जर्जर करून मारतो व अडवलेले जलप्रवाह मोकळे करतो (ऋग्वेद ८.६.६); म्हणून त्यास 'वृत्रहन्' म्हणतात. भक्तांना युद्धात विजय मिळवून देऊन 'मघ' म्हणजे वैभव देतो; म्हणून त्याला वैभवशाली म्हणजे 'मघवन्' असे विशेषण लावले आहे.

सायण व काही पश्चिमी पंडीत पाऊस अडविणारा दानव म्हणजे वृत्र होय, असा अर्थ करतात. तो पर्वतात राहतो याचा अर्थ तो पर्वतासारख्या मेघांमध्ये राहतो, असा केला आहे. अफगाणिस्तानपासून काश्मीरपर्यंतच्या हिमालयीन प्रदेशात आर्य राहू लागले, त्यावेळच्या तेथील बर्फमय प्रदेशातील परिस्थितीत उपासिलेला इंद्र हा देव होय असे मानले, तर इंद्र-वृत्र युद्धाची वर्णने अधिक समर्पक ठरतात, असे काहींचे मत आहे. शीतकाळी पाण्याचे प्रवाह गोठतात. त्यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष्य होते. हा शीतकाळ संपू लागला म्हणजे बर्फ वितळू लागतो. पर्वतातील बर्फ व हिमनद्या वितळविणारा सूर्य म्हणजेच इंद्र होय आणि शीतकाळ हा वृत्र होय, अशी उपपत्ती अधिक योग्य दिसते.

इंद्र ही देवता वेदपूर्वकालीन आर्यांमध्येही पूजनीय होती. बोगाझकई येथे सापडलेल्या इ. स. पू. चौदाव्या शतकातील दोन आर्य राजांत झालेल्या शांततेच्या तहनाम्यात उल्लेखिलेल्या देवतांमध्ये वरूण, मित्र, नासत्य यांच्याबरोबर इंद्राचाही निर्देश आहे. अवेस्तामध्ये दुष्ट देव म्हणून इंद्र उल्लेखिलेला आहे. 'वृत्रहन्' या विशेषणाच्याऐवजी त्याच अर्था 'वृत्रघ्‍न' (वेरेथ्रघ्‍न) हे नाव असलेली निराळी देवता अवेस्तात सांगितली आहे. आर्य भारतात आल्यानंतर आर्यांच्या युद्धव्यवसायामुळे इंद्राचे माहात्म्य वाढले, असे म्हणता येईल.

ब्राह्मणग्रंथांत यज्ञांचे महत्त्व देवतांच्यापेक्षाही अधिक वाढले व देव यज्ञांग म्हणून दुय्यम ठरले, त्याबरोबरच इंद्राचेही महत्त्व कमी झाले. इंद्राने केलेल्या ब्रह्महत्येची कथा ब्राह्मणग्रंथांत आली आहे. देवत्वष्टा याचा पुत्र विश्वरूप हा ब्राह्मण होता. त्याची हत्या इंद्राने केली; त्या ब्रह्महत्येच्या पातकातून सुटका होण्याकरता इंद्राने भूमी, जल, वृक्ष व स्त्रिया यांच्यामध्ये ते पातक वाटून दिले (भागवत ६.९; स्कंदपु. माहेश्वर १.१५; लिंगपु. २.५१).

पुराणग्रंथांमध्ये इंद्राचे माहात्म्य पुष्कळच घटले. विष्णू वा शिव या देवांचा देवाधिदेव म्हणून महिमा स्थापित झाला. ऋग्वेदामध्ये इंद्र हा द्यावा-पृथ्वीचा पुत्र किंवा त्वष्ट्याचा पुत्र म्हणून विर्दिष्ट केला आहे. परंतु इंद्र हा पुराणांप्रमाणे कश्यप व अदिती यांचा पुत्र होय. पुराणांप्रमाणे त्वष्ट्याने पुत्रनाशाच्या दुःखाने संत्रस्त होऊन इंद्राला मारणारा पुत्र होण्यासाठी यज्ञ केला. त्यात 'इन्द्रशत्रुर्वधस्व स्वाहा' असा मंत्र म्हणताना चुकीचा स्वरोच्चार केला. 'इन्द्रशत्रु' या सामासिक पदाचा स्वरभेद झाल्यामुळे तत्पुरुष समास म्हणजे 'इंद्राचा शत्रू' म्हणजे 'इंद्राचे हनन करणारा' असा होण्याच्या ऐवजी बहुव्रीही समास होऊन 'इंद्र ज्याचे हनन करतो तो' असा अर्थ झाला. इंद्राला वध्य असलेला वृत्र त्यामुळे उत्पन्न झाला. वृत्राच्या वधासाठी दधीची ऋषीच्या अस्थी मिळवून त्याची आयुधे तयार केली व त्यांच्या योगाने वृत्राला मारले. इंद्राला सहस्रनेत्र आहेत. त्याचा पुरोहित बृहस्पती, पत्‍नी इंद्राणी व पुत्र जयंत, ऋषभ व मीढ्‌वान हे होत. त्याचा अश्व-उच्चैःश्रवा, गज-ऐरावत, नगरी-अमरावती, उद्यान-नंदनवन व पेय-सोमरस होय. पुराणातील इंद्राची दुसरी प्रसिद्ध कथा इंद्र व अहल्या यांच्या संबंधाची होय. अहल्या ही गौतम ऋषीची पत्‍नी. गौतम ऋषीच्या आश्रमात, गौतम ऋषी गैरहजर असताना, इंद्राने गौतमाचे रूप घेऊन प्रवेश केला व तिचा संभोग घेतला. गौतमाने इंद्राला व अहल्येला शाप दिला. त्यामुळे इंद्राचे सहस्रनेत्र नष्ट होऊन त्याला त्या ठिकाणी सहस्र भगे म्हणजे छिद्रे पडली आणि अहल्या शिळा होऊन पडली (ब्रह्मपु. ८७, १२२).

तोतयेगिरी

तोतयेगिरी : खोटी बतावणी. हा एक कपटाचा किंवा फसवेगिरीचा प्रकार आहे. अशा प्रकारात एखाद्या व्यक्तीकडून स्वतःच्या वर्तनाने अथवा शब्दाने आपण दुसरेच कोणी इसम आहोत असे भासवून किंवा वस्तुतः स्वतः नसलेल्या स्थानावर असल्याचे भासवून इतरांची फसवणूक करण्यात येते. जी व्यक्ती फसविली गेली असेल किंवा ज्या व्यक्तीस त्रास झाला असेल किंवा नुकसान पोहोचले असेल ती व्यक्ती अशी फसवणूक करणाऱ्याविरुद्ध कायदेशीर उपाययोजना करू शकते.

नुसती तोतयेगिरी गुन्हा नाही; पण आर्थिक किंवा इतर फायद्याकरिता तोतयेगिरी करणे मात्र गुन्हा आहे. कारण त्याच्या मुळाशी इतरांचा बुद्धिभेद करून स्वतःचा स्वार्थ साधण्याकरिता फसविण्याचा उद्देश असतो. ज्या व्यक्तीबद्दल अशी तोतयेगिरी केली असेल ती व्यक्ती जिवंत, मृत किंवा काल्पनिक असली, तरी गांभीर्य कमी न होता ती कृती गुन्ह्यातच मोडते. नामसादृश्यामुळे किंवा चेहऱ्याच्या सारखेपणामुळे असे गुन्हे अधिक संभवतात. साधारणतः याच कारणामुळे पानिपतच्या युद्धानंतर (१७६१) भाऊसाहेब पेशवे व जनकोजी शिंदे यांचे तोतये निर्माण झाले होते.

रीक्षेच्या वेळी किंवा मतदानाच्या वेळी साधारणतः असे गुन्हे होण्याची शक्यता असते. बँक व्यवहारातही तोतयेगिरीची शक्यता असते. लोकसेवक नसताना लोकसेवक आहोत म्हणून भासविणे, जिवंत अथवा मृत मतदाराच्या नावे किंवा काल्पनिक नावाने मतदानपत्रिका मागणे किंवा मतदान करणे, त्याचप्रमाणे आपण पती आहोत असा भ्रम निर्माण करून एखाद्या स्त्रीचा उपभोग घेणे हे काही गुन्हे तोतयेगिरीच्या प्रकारात मोडतात. तिसरा तोतयेगिरीचा प्रकार जबरी संभोग या गंभीर गुन्ह्यात मोडत असून त्यास कायद्याने आजन्म कारावासासारखी कडक शिक्षा ठेवली आहे.

पाप-पुण्य

पाप-पुण्य : .



तत्त्वत: पापाची फळे या अथवा नंतरच्या जन्मात भोगावीच लागत असली, तरी व्यवहारात मात्र पापातून मुक्त होण्याचा किंवा त्याची तीव्रता कमी करण्याचा मार्ग नेहमीच शोधला जातो. प्रायश्चित्त, प्रार्थना, पापाची कबुली, क्षमायाचना तसेच पाणी व अग्नी यांच्यामुळे पाप नष्ट अथवा कमी होते, असे जगात सर्वत्र मानले जाते. पश्चात्ताप, प्राणायाम, जप, तप, यज्ञ, उपवास, होम, नामस्मरण, दान, तीर्थयात्रा, स्नान, पूजाअर्चा, परोपकाराची कृत्ये, भक्ती, योगसाधना, ज्ञानप्राप्ती, तांत्रिक प्रार्थना, जादूटोणा इ. मार्गांनी पाप दूर करण्याचा वा त्याची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. पाप हे केसात राहते वा शरिरात राहते, अशी समजूत असल्यामूळे पापमुक्तीसाठी मुंडण व स्नान केले जाते. भक्तीमार्गात भक्ताचे पाप दूर करणे, हे देवाचे कर्तव्यच मानले जाते. त्यामुळेच ख्रिस्ती संत, तसेच तुलसीदास, नामदेव इ. हिंदू संत स्वतःला पापी वा महापापी म्हणवून घेतात. एखादी व्यक्ती आपल्या सदवर्तनाने आपल्या पूर्वीच्या सात व नंतरच्या सात पिढ्यांना पापातून मुक्त करते अशी समजूत आहे. काही पापे अक्षम्य असल्यामूळे प्रायश्चित्तादी मार्गानी दूर होत नाहीत तर देहान्त प्रायश्चित्तानेच दूर होतात, असे मानले जाते.

तात्त्विक दृष्ट्या, ज्याने पाप केले असेल, त्यानेच त्या पापाचे फळ भोगले पाहिजे. परंतु कधी कधी एका व्यक्तीच्या पापाचे फळ दुसर्‍या व्यक्तीला भोगता येते वा भोगावे लागते, अशी विचारसरणीही आढळते. या दृष्टीने पुढील कथा सूचक आहे : देवांनी यज्ञातील पशुहत्येचे पाप एकत, द्वित व त्रित या पुरुषांवर ढकलले. त्यांनी ते सूर्यास्ताच्या वेळी झोपणारावर ढकलले. तेथून ते क्रमाने पिवळे दात असलेल्या, नखे किडलेल्या, थोरल्या बहिणीच्या आधी धाकटीचे लग्न लावणार्‍या, थोरल्या भावाच्या आधी लग्न करणार्‍या, मनुष्यवध करणार्‍या व गर्भपात घडविणार्‍या व्यक्तींवर ढकलले गेले. इंद्राने ब्रह्महत्येच्या पापातून मुक्त होण्यासाठी ते पाप निरनिराळ्या ठिकाणी विभागले, अशीही कथा आहे. पापी माणसाशी संपर्क ठेवला, तर त्याचे पाप आपल्याला लागते, या कल्पनेतून पापाची संसर्गजन्य स्पष्ट होते. प्रजा व राजा, पती व पत्नी, गुरू व शिष्य, मालक व नोकर आणि पूर्वज व वंशज यांना विशिष्ट परिस्थितीत एकमेकांची पापे लागतात. दुसर्‍याचे वाहन, शय्या, आसन, घर, विहीर इत्यादींचा उपभोग घेतला, तर त्या वस्तूंच्या मालकाचे १/४ पाप आपणाकडे येते इ. विचार मनुस्मृतीत आढळतात. राजाला प्रजेच्या हातून घडलेल्या पापाचा धनी व्हावे लागते व प्रजेने पुण्य केले, तर त्या पुण्याचाही अंश त्याला लाभतो, असे महाभारतात म्हटले आहे. समाजावरचे संकट दूर करण्यासाठी समाजाचे पाप एखाद्या व्यक्तीवर वा पशूवर लावून त्याला शिक्षा देण्याची प्रथा अनेक ठिकाणी होती. आपला हात त्याच्या मस्तकावर ठेवून आपले पाप त्याच्यामध्ये संक्रांत करण्याचा प्रयत्न केल्याचे वर्णन सापडते. दुसर्‍याच्या पापाचे भक्षण करण्याची एक प्रथा वेल्स लोकांत होती. सहा पेन्स दिले, की एखादा गरीब मनुष्य प्रेतावरून उतरलेला पावाचा एक तुकडा व मद्याने भरलेला एक प्याला स्वीकारून मृताचे पाप घेत असे. मद्याचा प्रत्येक थेंब म्हणजे एक पाप, असे मानले जाई. भारतात १८०१ साली तंजावरच्या राजाचा मृत्यू झाल्यावर त्याच्या अस्थींचे चूर्ण करून ते १२ ब्राह्मणांनी भाताबरोबर खाल्ले व मृताचे पाप स्वतःकडे घेतले, असे म्हणतात.

पापविषयक काही कल्पना शाश्वत असतात, तर काही तशा नसतात. उदा., असत्य, व्यभिचार इ. कृत्ये ही पापे होत, हे मत बहुतेक सर्व काळांत व देशांत प्रचलित होते व आहे. याउलट, देवतेची मूर्ती फोडण्यासारखे कृत्य हिंदूला पाप वाटते, तर मुसलमानाला वाटत नाही. पापांच्या तीव्रतेनुसार त्यांमध्ये तारतम्य मानले जाते, ही एक महत्त्वाची गोष्ट होय; परंतु काही वेळा एखाद्या समाजाला जे पाप घोर वाटते, ते दुसर्‍या समाजाला क्षुल्लक वाटण्याचीही शक्यता असते. प्रत्येक समाजाने आपापली संस्कृती व समाजरचना यांना अनुसरून कोणत्या पापाला महापाप म्हणावयाचे ते ठरविलेले असते. उदा., वहाबीप्रणीत नीतिनियमांनुसार तंबाखू ओढणे हे महापाप होय, तर व्यभिचार आणि खोटी साक्ष ही पापे क्षुल्लक होत. ट्युटॉनिक लोक भित्रेपणा हे अक्षम्य पाप मानत. अल्लाच्या बरोबरीचा दुसरा कुणी देव आहे असे मानणे, हे मुसलमानांच्या दृष्टीने घोर व अक्षम्य पाप होय. प्रेत पुरणे वा जाळणे या पापाला प्रायश्चित्त नाही, असे पारशी लोक मानतात. वर्ण व आश्रम यांनुसारही पापकल्पनेत फरक होत असे. उदा., क्षत्रियाने रणांगणावरून पळून जाणे, वैश्याने खोटी वजनमापे वापरणे आणि शुद्राने कपिला गायीचे दूध पिणे, ही त्या त्या वर्णातींल व्यक्तीच्या दृष्टीने पापे मानली जात. कुणी असत्य, तर कुणी नास्तिकता हे घोर पाप मानतात. ‘सर्व पापे समान आहेत’, असे अव्यवहार्य मत ग्रीसमधील स्टोइक पंथात होते.

हिंदूंनी भीषण व काळ्या अशा पुरूषाच्या रूपाने पापाचे मानवीकरण केले आहे. ब्रह्महत्या हे मस्तक, गोहत्या हे बाहू, स्त्रीहत्या हे डोळे इ. पद्धतीने त्याचे सर्व अवयव कोणत्या ना कोणत्या पापानेच बनल्याची कल्पना करण्यात आली आहे. ज्यू लोकांच्या साहित्यातही पापाचे मानवीकरण करून त्याला एक व्यक्ती वा दुष्ट देवता मानल्याचे दिसते. पाप करू इच्छिणारी माणसे पापकृत्यात मदत मिळावी म्हणून विशिष्ट देवतांची पूजा करतात. चोर, मद्यपी, वेश्या, जुगारी इ. व्यक्तींच्या विशिष्ट आराध्य देवता असल्याचे आढळते.

सर्वच व्यक्ती केव्हा ना केव्हा पाप करतात, ग्रीक व हिंदू पुराणांतील देवही याला अपवाद नाहीत; परंतु काही व्यक्तींना निष्पाप मानण्याची प्रवृत्तीही दिसते. म्हणूनच केल्टिक लोकांत पापहीन जोडप्याच्या मुलाचा बळी मागितल्याची पुराणकथा आढळते. माणूस स्वभावतः निष्पाप असतो, असे कन्फ्यूशस इ. अनेक संप्रदायांतून मानलेले आढळते. हाज यात्रेमुळे व्यक्ती नवजात बालकाइतकी निष्पाप बनते, या इस्लामी कल्पनेत नवजात बालक निष्पाप मानल्याचे दिसते. प्रेषित हे निष्पाप असतात, असे काही मुसलमान मानतात, तर काही मुसलमानांच्या मते प्रेषितांकडूनही क्षुल्लक पापे होऊ शकतात; परंतु इमाम मात्र निष्पाप असतात. ईजिप्तमध्ये राजे, सरदार, अधिकारी इ. प्रतिष्ठीत व्यक्तींनी शिलालेखांतून आपण निष्पाप असल्याची ग्वाही दिलेली आढळते आणि त्यांच्या थडग्यांवरून त्यांच्या नातेवाईकांनी अशाच अर्थाचे लेख कोरलेले आढळतात.

धर्मशास्त्रांना विहित अशा कर्मकांडातील कर्मे आणि परोपकाराची कृत्ये ही पुण्यकारक मानली जातात. पापकृत्ये टाळणे हा पुण्यप्राप्तीचाच एक प्रकार होय. तीर्थयात्रा, पूजा, यज्ञ, दान, व्रते, उपवास इत्यादींमुळे पुण्य घडते. लोकांसाठी धर्मशाळा, अन्नछत्रे, पाणपोया, मंदिरे, जलाशय इत्यादींची निर्मिती केल्यानेही पुण्य लागते. युद्धात मृत्यू येण्यासारख्या कर्तव्यपालनाच्या कृत्यांनीही पुण्य लागते.

पुण्यवंताला मृत्यूनंतर चांगली गती मिळते. स्वर्गादींची प्राप्ती होऊन त्याचे पारलौकिक कल्याण होते, त्याला नक्षत्रादी रूपांनी स्थिर राहता येते, मृत्यूनंतर उत्तम योनीमध्ये जन्म मिळतो किंवा ऐश्वर्य, सुखोपभोग, संतती, आरोग्य इत्यादींच्या प्राप्तीने त्याचे ऐहिक कल्याण होते. पुण्याच्या सामर्थ्यावर माणूस देवांनाही नमवू शकतो. एखाद्याला शाप किंवा वर देण्याचे सामर्थ्य त्याला प्राप्त होते. स्वतःच्या पुण्याचा स्वतःच उच्चार केला तर मात्र पुण्य नष्ट होते, अशी समजूत आहे.

क्वचित एकाच्या पुण्याचा दुसर्‍याला फायदा होऊ शकतो. आपल्या पुण्यात आपला स्वामी वाटेकरी होऊ दे आणि स्वामीच्या पुण्यात मला वाटेकरी होऊ दे, असे बौद्ध भिक्षू होणार्‍या व्यक्तीच्या प्रार्थनेत म्हटलेले असते. रोमन कॅथलिक चर्चच्या मते धर्मनिष्ठ जिवंत व्यक्ती ‘पर्गेटरी’ मध्ये असलेल्या आत्म्यांच्या कल्याणासाठी आपले पुण्य त्यांना देऊ शकतात. इस्लामनुसार ज्याचे पाप आणि पुण्य हे अगदी समान असते, दुसर्‍या पुण्यवंताकडून काही पुण्य उसने घेऊन पापापेक्षा आपले पुण्य वाढवू शकतो. एखादा मनुष्य आपल्या पुण्यकृत्यांनी आपल्या पूर्वीच्या व नंतरच्या पिढ्यांचा उद्धार करतो. पतिपुत्रादींच्या कल्याणासाठी स्त्रिया स्वतः पुण्यकृत्ये करतात. स्वतःसाठी इतरांकरवी तीर्थयात्रादी पुण्यकृत्ये करण्याची प्रथाही आढळते. आधी प्रेतावर ठेवलेला व नंतर उतरून घेतलेला केक मृताच्या नातेवाईकांनी खाल्ला, तर मृताचे सगदुण व सामर्थ्य त्या नातेवाईकांत उतरतात, अशी कल्पना बव्हेरियामध्ये होती.

पाप-पुण्यांच्या कल्पनेचा समाजधारणेसाठी बराचसा उपयोग होऊ शकतो. सर्वसामान्य लोकांवर कायद्यापेक्षाही या कल्पनेचा प्रभाव बहूधा अधिक असतो. पापाच्या परिणामाची भीती वाटल्यामुळे माणसे दुष्कृत्यांपासून परावृत्त होतात. याउलट, पुण्यकर्माने कल्याण होते या भावनेने ती सत्कृत्यांकडे प्रवृत्त होतात. याचा परिणाम म्हणून समाजात गुन्हेगारप्रवृत्तीला आळा बसतो आणि नीतिमत्ता, सदाचार, शिष्टाचार इ. सदगुणांची वाढ होते. अप्रत्यक्ष रीत्या सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण होते आणि समाजाला एक स्थिर व्यवस्था प्राप्त होण्यास मदत होते. परंतु एका दृष्टीने पाहता, भीती आणि लाभ यांच्या पोटी निर्माण झालेली नीतिमत्ता ही तत्त्वतः श्रेष्ठ दर्जाची म्हणता येत नाही. शिवाय, पाप-पुण्यांच्या कल्पनेमुळे समाजाची काही बाबतींत हानीही होते. दुसरे असे, की समाजाच्या उन्नतीकरता जुन्या पुण्यकारक मानलेल्या रूढीत व पाप म्हणून समजलेल्या पद्धतीत बदल करून सुधारणा करण्याची आवश्यकता असते; परंतु पाप-पुण्यांच्या धार्मिक श्रद्धांमुळे अशी सुधारणा करण्यात अंधश्रद्ध समाज अडथळा उत्पन्न करतो. नव्या काळाप्रमाणे बदलू पाहणार्‍या माणसाचे स्वतःच्या मनोधारणेनुसार एखादे कृत्य करण्याचे वा न करण्याचे व्यक्तिगत स्वातंत्र्य नाहीसे होते आणि तो भुतकाळातील रूढींच्या प्रवाहातच अडकुन पडतो. अर्थातच पुरोगामी दृष्टी निर्माण होऊ शकत नाही आणि समाजाची प्रगती कुंठित होते. रूढीने पाप मानले जाणारे एखादे हितकारक कृत्य हातून घडले, तरी अंधश्रद्धेमुळे अकारण भीती वाटून मनःस्वास्थ्य नाहीसे होते. याउलट, एखादे कृत्य मुळीच हितकारक नसते; परंतु ते पुण्यकारक आहे अशी समजूत असल्यामुळे माणसे ते कृत्य करताना कितीतरी यातना अकारण सहन करतात व कित्येकदा अपायही करून घेतात. मानवनिर्मित विषमतेचे आणि अन्यायाचे समर्थन करण्यासाठी पूर्वजन्मातील पाप-पुण्यांचा हवाला दिला जातो, ही या संकल्पनेमुळे होणारी मानवी समाजाची एक प्रचंड हानी होय. पाप-पुण्यांविषयीच्या अंधश्रद्धेमुळे मनुष्य दैववादी बनण्याचा धोकाही संभवतो. हे सर्व दोष ध्यानात घेऊन चार्वाकादी बुद्धिवाद्यांनी प्राचीन काळापासूनच पाप-पुण्यांच्या संकल्पनेवर कडक टीका केलेली दिसते.


पाप-पुण्यांची नेमकी व्याख्या करणे अवघड असले, तरी सामान्यतः असतकर्मापासून निर्माण होणारी विशिष्ट शक्ती म्हणजे पाप व सत्कर्मापासून निर्माण होणारी विशिष्ट शक्ती म्हणजे पुण्य असे मानले जाते. ही पाप-पुण्यरूप शक्ती दिसत नसल्यामुळे हिंदू लोक तिला अदृष्ट असे म्हणतात. अदृष्टामध्ये कर्मानुसार फळदेण्याचे सामर्थ्य असते. मुख्यत्वेकरून कर्मापासून निर्माण होणार्‍या अदृष्ट शक्तीला पाप-पुण्य म्हटले जात असले, तरी लक्षणेने असतकर्माला पाप व सतकर्माला पुण्य असेही म्हटले जाते. पाप-पुण्यात्मक अदृष्ट हे जीवात्म्याचा धर्म आहे, असे न्यायवैशेषिकादी तत्त्ववेत्ते मानतात आणि ते प्रकृतीपासून बनलेल्या अंतःकरणाचा धर्म आहे, असे सांख्य, वेदान्ती इ. तत्त्ववेत्ते मानतात. माणसाला ईश्वराच्या नियमांप्रमाणे वागण्याचे वा ते नियम मोडण्याचे स्वातंत्र्य आहे, मृत्यूनंतरही आत्म्याचे अस्तित्व असते, माणसाला आपल्या कर्माचे फळ केव्हाना केव्हा भोगावेच लागते इ. गोष्टी गृहीत धरूनच पाप व पुण्य यांविषयीचे विचार मांडलेले असतात.

सामान्यतः पाप व पुण्य यांना भावात्मक अस्तित्व आहे. पापाचा नाशही लक्षणेने पुण्यात गणला जातो. सत्कर्माने वा प्रायश्चित्ताने पापाचा नाश होतो. व्यभिचार करणे हे पाप आहे; परंतु व्यभिचार केला नाही, हे प्रत्यक्ष व विशेष पुण्य आहे, असे नाही. तसेच पर्वकाळी तीर्थस्नानामुळे पापनाश होतो व पुण्य लागते; पण तसे स्नान केले नाही, तर पापही लागते. प्रार्थना, संध्या, पूजा, जप इ. नित्यकर्म केले, तर पापनाश होतो, वेगळे असे पुण्य लागत नाही; पण ते केले नाही, तर मात्र पाप लागते. म्हणून नित्यकर्मास पुण्यकर्म म्हणतात. याउलट, काग्य कर्मांनी पुण्य लागते, पण ती केली नाहीत, तर पाप लागते असे नाही. असे असले, तरी तीर्थयात्रेसारखे एखादे कृत्य हे एकाच वेळी पापनाशकही म्हटले जाते आणि पुण्यदायकही म्हटले जाते.

भारतीय तत्त्ववेत्त्यांच्या मते अदृष्ट तीन प्रकारचे : संचित, प्रारब्ध व क्रियमाण. संचित म्हणजे मागील जन्मांचे; प्रारब्ध म्हणजे विद्यमान जन्म ज्याने प्राप्त होतो व या जन्मात भोगावे लागते ते व क्रियमाण म्हणजे या जन्मातल्या कर्माने निर्माण होणारे. पाप-पुण्यांची फळे शाश्वत नसतात. त्यांचा भोग घेतला, की ती संपतात; त्यांचा क्षय होतो. पापामुळे माणसाच्या हिताचा कायमचा नाश होत नाही किंवा पुण्यामुळे कायमचा उद्धारही होत नाही. माणसाला पापाप्रमाणेच पुण्याची फळे भोगण्यासाठीही ⇨ पुनर्जन्म  घ्यावा लागतो. त्यामुळे पुण्यवंतालाही मोक्ष मिळू शकत नाही आणि पुण्यकर्मही पापाप्रमाणेच बंधनकारक ठरते. म्हणूनच मुमुक्षूने निष्काम सत्कर्मद्वारा चित्त शुद्ध करून संचित व क्रियमाण अशा पाप व पुण्य या दोन्ही कर्मांचा नाश करावयाचा असतो. प्रारब्ध मात्र भोगावेच लागते. पाप हे ‘पापात्मक पाप’, पुण्य हे पापापेक्षा चांगले असले तरीही बंधनकारक असल्यामुळे ते ‘पुण्यात्मक पाप’ आणि जे मोक्ष देते ते खरे शुद्ध पुण्य, असे जे ज्ञानदेवांनी म्हटले आहे, ते याच अर्थाने होय. सर्व मोक्षवादी व वेदान्तीही पुण्याला ‘पुण्यात्मक पाप’ म्हणतात.

चुकणे हा मानवी स्वभाव असल्यामुळे प्रत्येक मानवाच्या हातून पापे घडतातच. देवांच्या हातूनही पापे घडलेली आहेत, असे जगातील अनेक पुराणकथांतून दिसते. परंतू त्याबरोबरच चांगली कृत्ये करण्याकडेही मानवाची प्रवृत्ती असल्यामुळे प्रत्येकाच्या हातून थोडी का होईना पुण्यकर्मेही घडतातच. म्हणजे पाप-पुण्यांचा हिशोब हा माणसाच्या चांगल्या-वाईट कृत्यांचा जमाखर्चच असतो. चित्रगुप्त नावाची देवता हा जमाखर्च लिहिते, असे हिंदू लोक मानतात. ज्याचे पुण्य जास्त व पाप कमी असते त्याला आधी नरकात जाऊन आपल्या पापाचे फळ भोगावे लागते आणि ज्याचे पाप जास्त व पुण्य कमी असते त्याला आधी पुण्याचे फळ भोगण्यासाठी स्वर्गात जावयास मिळते. या संदर्भात येथे ही गोष्ट विशेष लक्षात ठेवली पाहिजे, की यहुदी, ख्रिस्ती व इस्लाम हे धर्म स्वतःच्या धर्माबाहेरील माणसे पापातच निरंतर राहतात; आपल्या धर्माचा स्वीकार केल्यानंतरच त्यांना पुण्यप्राप्ती होते, असे मानतात. शिवाय पाप काय व पुण्य काय हे त्या त्या धर्मग्रंथांच्या आधारेच निश्चित करता येते. ⇨ स्वर्ग व नरकादींच्या या कल्पना प्रत्येक धर्मात भिन्नभिन्न आहेत.

ईश्वर, देवता इ. अतींद्रिय शक्तींच्या आज्ञेचा भंग करणे म्हणजे पाप, असे सामान्यतः मानले जाते. धर्मांचे नियम हे पवित्र धर्मग्रंथांनी सांगितलेले वा ईश्वरनिर्मित मानले जात असल्यामुळे धर्माविरुद्ध आचरण किंवा अधर्म म्हणजे धर्मग्रंथांविरुद्ध वा ईश्वराविरुद्ध केलेले पाप, असा याचा अर्थ होतो. धर्माचे नियम हे वस्तुतः धर्मशास्त्रे, धर्मगुरू, सामाजिक रूढी इत्यादींपैकी कुणी तरी निर्माण केलेले असतात; त्यामुळेच धर्मशास्त्रादींनी नित्य व नैमित्तिक म्हणून विहित असलेली कर्मे न करणे आणि त्यांनी निषिद्ध ठरवलेली कर्मे करणे पाप होय. म्हणूनच, पाप ही प्रामुख्याने धर्मशास्त्रातील संकल्पना ठरते. परंतु असत्यादी अनैतिक वर्तनाला पाप व परोपकार इ. नैतिक वर्तनाला पुण्य मानले जात असल्यामुळे, पाप व पुण्य या संकल्पना नीतिशास्त्राच्या अंतर्गतही असतात. सामान्य परिस्थितीत जे कृत्य पाप मानले जाते, त्या कृत्याला संकटाच्या प्रसंगी मात्र पाप मानण्याऐवजी आपद्धर्म मानले जाते. म्हणूनच प्राण वाचविण्यासाठी अत्यावश्यक असेल तर चोरी केली, खोटे बोलले, तरी ते पाप ठरत नाही.

पाप व गुन्हा या तत्त्वतः दोन वेगवेगळ्या संकल्पना आहेत. धर्मविरुद्ध आचरण म्हणजे पाप असून त्याबद्दल प्रायश्चित्त घ्यावे लागते, तर राजशासनाच्या कायद्याविरुद्ध केलेले वर्तन हा गुन्हा असून त्याबद्दल शिक्षा भोगावी लागते. उदा., अपवित्र अवस्थेत पूजा करणे हे पाप असले तरी तो गुन्हा नव्हे; याउलट, रहदारीचे नियम मोडणे हा गुन्हा असला तरी पाप नव्हे. गुन्ह्यापेक्षा पापाचे क्षेत्र एका दृष्टीने अधिक व्यापक आहे. कारण पापकृत्याचा विचार मनात आला, तरी ते पाप ठरते; परंतु गुन्हा करण्याचा विचार मनात आला, तरी तेवढ्यावरून तो गुन्हा ठरत नाही. शिवाय, गुप्तपणे पापकृत्य केले तरी त्याचे परिणाम भोगावे लागताच. कारण अदृष्ट उत्पन्न होतेच. शिवाय देवाला सर्व प्रकारची पापे दिसतात, अशी समजूत असते. याउलट, एखाद्याने गुन्हा केलेला असला तरी काही पुरावा उपलब्ध नसल्यास, त्याला गुन्हेगार न मानता निर्दोष म्हणून सोडले जाते. पाप व गुन्हा यांत तत्त्वतः असा फरक असला, तरी कित्येकदा एकच कृत्य हे पाप व गुन्हा या दोन्ही प्रकारांत मोडते. उदा., चोरी हे पापही आहे व गुन्हाही आहे. काही ठिकाणी या गोष्टींचे वर्गीकरण केलेले दिसत नाही. अमेरिकन इंडियन लोकांनी पाप, गुन्हा, दुर्दैव या गोष्टींचा ‘वाईट’ हा एकच वर्ग केला आहे. जपानी लोक अस्वच्छता, दुष्कृत्ये व संकटे या अर्थी ‘त्सुमि’ हा एकच शब्द वापरतात. ज्यू लोकही पाप, अपराध, शिक्षा इ. अर्थ व्यक्त करण्यासाठी एकच शब्द वापरतात.

मानवाच्या हातून पाप का घडते, या प्रश्नाची विविध उत्तरे देण्यात आली असून धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, अध्यात्मशास्त्र, समाजशास्त्र, मानसशास्त्र, कायदा इत्यादींपुढची ती एक समस्या आहे. माणूस स्वतःहून पाप करीत नाही, तर दैव, मद्य, क्रोध, द्यूत, निष्काळजीपणा व स्वप्न यांमुळे तो पापास प्रवृत्त होतो, असे ऋग्वेदात म्हटले आहे. रजोगुणातून वा तमोगुणातून निर्माण होणारे काम, क्रोध, लोभ किंवा मोह हे माणसाला पापाची प्रेरणा देतात, असे गीतेत म्हटले आहे. इंद्रियनिग्रहाचा अभाव, अज्ञान, दारिद्रय, दुःखातून सुटण्याची इच्छा इ. कारणांनी माणूस पापे करतो. अत्यंत समृद्धी, यश, तारुण्य, सामर्थ्य, सौंदर्य, . चांगल्या गोष्टीही पापप्रवृत्तीला पोषक ठरतात, असे अनेकांनी म्हटले आहे आणि व्यवहारातही तशी अनेक उदाहरणे दिसतात. पापाचे मूळ वासनेत म्हणजे तृष्णेत आहे, असे भगवान महावीर व बुद्ध मानतात. सैतानाच्या प्रेरणेने आदम व ईव्ह यांनी आद्य पाप केले आणि आनुवंशिक रीतीने आलेले ते पाप सर्व मानवांतून उपजतच असते, असे ख्रिस्ती धर्म मानतो. अहरिमन अथवा अंग्रो-मइन्यू याने पहिल्या दांपत्याला फसवून पाप करायला लावले, तोच भविष्यातील परिणाम दडवून माणसाला पाप करायला लावतो इ. विचार पारशी लोकांत आढळतात. याउलट, ज्याचा अधःपात करावा असे देवाला वाटते, त्याच्याकडून देवच पापकर्म घडवून आणतो, असा विचार कौषीतकि उपनिषदात  आढळतो. सर्व गोष्टी देवानेच निर्माण केलेल्या असल्यामुळे पापही देवानेच निर्माण केलेले आहे, असेही एक मत आहे. पापवृत्ती माणसात उपजत असते, की ती परिस्थितीमुळे निर्माण होते, याविषयी मतभेद आढळतात. मूळचा शुद्ध व मुक्त असलेला आत्मा अज्ञानामुळे बद्ध होऊन पाप-पुण्यात्मक कर्मे करण्यास प्रवृत्त होतो, असे वेदान्ताचे मत आहे. माणूस उपजत पापी नसतो, फक्त दुबळा असतो आणि त्याच्या दुबळेपणामुळे त्याच्या हातून पाप घडते, असे इस्लाममध्ये मानले जाते. एकंदरीत, पापकृत्यांमागे विविध कारणे व उद्देश असतात, असे दिसते.

पापांचे प्रकार कोणते व किती यांविषयी देश, काल, व्यक्ती इत्यादींच्या अनुरोधाने अनेक मते आढळतात. भारतीय संस्कृतीमध्ये पाप हे मानसिक, वाचिक व शारीरिक असे त्रिविध असते. परधनाचा लोभ, इतरांचे अनिष्ट चिंतणे आणि खोट्याचा अभिनिवेश ही मानसिक पापे होत. कठोर वा खोटे बोलणे, चहाडी आणि असंबद्ध बडबड ही वाचिक पापे होत. जबरदस्तीने दुसर्‍याची वस्तू घेणे, शास्त्रविरुद्ध हिंसा करणे आणि परस्त्रीगमन ही कायिक पापे होत. स्वतःचे अहित करणारे आणि दुसर्‍याचे अहित करणारे, असे पापांचे आणखी दोन प्रकारही मानले जातात. परंतु महापापे, पापे, दुय्यम पापे आणि क्षुल्लक पापे अशा प्रकारचे वर्गीकरण मात्र जगात सर्वत्र आढळते. ब्रह्नहत्या, मद्यपान, गुरुपत्नीशी संभोग, सोन्याची चोरी आणि ही चार पापे करणाराशी संपर्क ठेवणे, ही छांदोग्य उपनिषदात  सांगितलेली पापेच पुढे ‘पंच महापातके’ म्हणून प्रसिद्ध झाली. आपस्तंब धर्मसूत्रांत  पतनीय (नरकात नेणारी) व अशुचिकर अशी दोन प्रकारची पापे सांगितली आहेत. महापापांमुळे मनुष्य आपल्या जातीतून पतित होतो, म्हणून ती पतनीय पापे, तर आर्य स्त्रीने शूद्राशी संभोग करणे इ. कृत्ये महापातकातच गणली आहेत. निषिद्ध अन्नाचे सेवन, गलिच्छ भाषण इ. पापे अपवित्र म्हणजे अशुचिकर होत. कात्यायनाने अतिपाप, महापाप, पातक, प्रासंगिक आणि उपपातक असे पापांचे वर्ग मानले होते. अतिपापापेक्षा मोठे असे दुसरे पाप नसते. वृद्धहारीताने महापातक, पातक, अनुपातक, उपपातक, आणि प्रकीर्णक (संकीर्ण) असे पाच प्रकार मानले होते. विष्णुधर्मसुत्राने अतिपातक, महापातक, अनुपातक, उपपातक, जातिभ्रंशकर, संकरीकरण, अपात्रीकरण (भेटीस अपात्र बनविणारे), मलावह (अपवित्र बनविणारे) आणि प्रकीर्णक अशी नऊ पापे मानली होती. एकंदरीत, पापांच्या प्रकारांची संख्या आणि कोणत्या पापाला महापातक, उपपातक इ. संज्ञा द्यावयाची, यांविषयी थोडे थोडे मतभेद आहेत.

ख्रिस्ती धर्मात अहंकार, लोभ, आसक्ती, मत्सर, अधाशीपणा, क्रोध व आळस ही सात घोर पापे मानली असून इतर पापे क्षम्य वा उपेक्षणीय मानली आहेत. घोर पापांमुळे दैवी नियमांचा भंग होतो, देवाशी असलेले नाते तुटते आणि आत्मनाश होतो, असे मानले जाते. इस्लाम धर्मात ‘कबीरा’ (महापाप) आणि ‘सगीरा’ (क्षुल्लक पाप) असे पापांचे दोन प्रकार मानले आहेत. अल्लाखेरीज इतरावर श्रद्धा ठेवणे हे घोर व अक्षम्य पाप मानले जाते. सुमेरियन व बॅबिलोनियन संस्कृतींमध्ये पापांचे वर्गीकरण दोन गटांत केले होते. देवाला अर्पण केलेले अन्न खाणे वा अपवित्र अवस्थेत मंदिरात प्रवेश करणे, यांसारखी पापे ही धर्म वा कर्मकांड यांच्या क्षेत्रांतील मानली जात. आई-वडिलांचा तिरस्कार करणे, खर्‍याला खोटे व खोट्याला खरे म्हणणे इ. पापे ही नीती व राजनीती यांच्या क्षेत्रांतील मानली जात. जपानमधील शिंतो धर्मात स्वर्गातील पापे व पृथ्वीवरील पापे, असे पापांचे दोन प्रकार मानले होते.

या जन्मीच्या किंवा पूर्वजन्मीच्या पापामुळे विशिष्ट दुष्परिणाम भोगावे लागतात. माणसाकडून पाप अजाणता घडले की त्याने ते जाणीवपूर्वक केले, त्याने ते एकदाच केले की अनेकदा केले इ. गोष्टींनुसार या दुष्परिणामांची तीव्रता कमीजास्त होते. नरक हे मोठ्या पापाची फळे भोगण्याचे एक स्थान असून ती फळे भोगण्यासाठी एक यातनादेह धारण करावा लागतो. पापी व्यक्तीला क्षुद्र अशा विविध योनींत जन्म घ्यावा लागतो. कोणते पाप केले म्हणजे कुत्रा, डुक्कर, कृमी, वनस्पती इ. योनींत जन्म घ्यावा लागतो, याविषयीची वर्णने आढळतात. पापी व्यक्तीला त्रिविध ताप भोगावे लागतात आणि स्वर्ग व मोक्ष यांना मुकावे लागते. इहलोकातही समाजाचा बहिष्कार भोगावा लागल्यामुळे तिची प्रतिष्ठा नाहीशी होते. अशा रीतीने तिच्या ऐहिक व पारलौकिक अशा दोन्ही कल्याणांची हानी होते. पाप केल्यामुळे माणसाची वा राष्ट्राची संरक्षक देवता त्याला सोडून जाते, असे ईजिप्त, बॅबिलोनिया इ. अनेक ठिकाणी मानले जाई. मृत्यू, रोग, कुरूपता, अपंगता, अधःपात इ. गोष्टी हे पापाचे परिणाम मानले जात. माणसाचे आयुष्य गंभीर पापांमुळे १२ वर्षांनी, तर क्षुल्लक पापांमुळे १०० दिवसांनी कमी होते, असे ताओ संप्रदायात मानले जाई. पापांमुळे मानवाचे आद्य अमरत्व नष्ट झाले इ. अर्थांच्या पुराणकथा आहेत. पापांमुळे माणूस राक्षस वा राक्षसाचा कैदी बनतो, असेही काही ठिकाणी मानत. कधी पापाचा परिणाम लगेच भोगावा लागतो, तर कधी तो कित्येक जन्मांनंतर भोगावा लागतो; परंतु उशिरा का होईना, परिणाम हा भोगावाच लागतो. कारण हिंस्त्र पशू आपल्या सावजावर झडप घालतो किंवा हजारो गायींतून वासरू आपल्या आईला शोधून काढते, त्याप्रमाणे पापकृत्य पापी व्यक्तीला शोधून काढते. कित्येकदा एखादी व्यक्ती दुःखादी परिणाम भोगत आहे हे पाहुन, तिने या अथवा पूर्वीच्या जन्मात काही तरी पाप केलेले असावे, असे अनुमान केले जाते. अनेक आदिम वा सुधारलेले लोक देवाला लहरी हुकूमशहा मानत. एखादे कृत्य करीत असताना ते देवाला आवडेल की नाही ते कळत नाही, शिक्षा मिळाल्यानंतरच आपले कृत्य देवाला न आवडल्याने आपण पापी ठरलो, असे ते लोक अनुमान करतात.


पहा : कर्मवाद; निषिद्धे; पवित्र व पवित्रेतर.
संदर्भ : Kane, P. V. History of Dharmasastra, Vol. IV, Poona, 1973.